Sunday, May 17, 2015

स्ट्रक्चरल ड्राइंग - किल्ले तिकोना





श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या वतीने किल्ले तिकोना येथे वास्तूंची आकृत्या तयार करण्याच्या दृष्टिने १६ मे २०१५ रोजी मोहिम घेण्यात आली. यामध्ये मुख्यतः शंकराचे मंदिर, कोरीव गुंफा यांची मापे घेण्यात आली. तसेच नुकतेच स्वच्छ केलेल्या वाड्यांच्या जोत्यांची सुद्धा मापे घेण्यात आली. संस्थेचे सभासद श्री विशाल ढमाले आणि श्री विशाल गोराणे यांच्या नेतृत्वाखाली ही मोहिम पार पडली. सध्या किल्याचा नकाशा बनवून त्या किल्यावर असलेल्या वास्तू, देऊळ, मुर्ती, गुंफा आणि चौथरे यांचे स्थल निश्चिती त्या नकाशात करण्यात येत आहे. पुढे भविष्यात संवर्धनाच्या कार्यात याचा उपयोग होईल अशी आशा संस्थेला वाटते.

दुर्ग संवर्धन म्हणजे किल्याची स्वच्छता, वृक्षारोपण किंवा पाण्याचे स्त्रोत स्वच्छ करणे यावर सिमित न रहाता त्यांची स्ट्रक्चरल ड्राइंग आणि पर्यावरणाचे दस्तऐवज बनवणे असे उपक्रम पुढील वर्षांत करण्यासाठी संस्था प्रयत्न करणार आहे. पर्यावरण आणि पक्षीप्रेमी, आर्किटेक्ट, बाॅटनी या विषयाचे अभ्यासक आणि आवड असणारे या कामात सामिल व्हावे असे संस्थेतर्फे आवाहन करत अाहोत. इच्छुक व्यक्तींनी कृपया संपर्क साधावा.

कळावे,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील ।।

Friday, May 15, 2015

"आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे"

६ मे दिवस उजाडला, रोहिडा किल्यावरील यारीचे परीक्षण करण्याचे दिवस ठरला होता. आमच्या संस्थेचे श्री हनुमंत देशमुख काकांनी एक इंडिजिनियस संकल्पनेतून ही यारी तयार केली होती. 
यारीचे सर्व गोष्टी आदल्या आठवड्यात किल्याच्या मध्यात चढवण्यात आल्या होत्या. यंत्राची जोडणी झाली आणि डिझेल इंजिनला चालू करण्यात आले. 
डिझेल इंजिन आर.पी.एम. पेक्षा आमच्या सर्वांच्या हृदयाचे आर.पी.एम. वाढले होते. यारीचा पहिला गेअर पडला आणि यारीची बकेट वर जायला लागली. 
काही काळातचं तिने ३० फुट उंची गाठली. सगळ्याच्या मुखावर आनंद दिसत होता पण काही वेळातच डिझेल इंजिन बंद पडले आणि सगळ्याचा ठोका चुकला. 
यारीची बकेट ५०-५५ फुटावर जाऊन मध्येच थांबली होती. डिझेल इंजिन चालू केले आणि काही मिनटातचं बंद झाले. काय झाले काय होतयं याची आम्ही कल्पनाकरे पर्यंत देशमुख काकांनी एकदम सागिंतले ५ बी.एच.पी. इंजिनची ताकद संपली. 
त्याच्याने हा किल्याचा चढ मटेरियल सकट पार करणे शक्य नाही. आपल्याला दुसरा पर्याय शोधणे लागले. आम्ही सगळे एकमेकांनाकडे पाहुन पुढं काय याचा विचार करू लागलो आणि काका म्हणाले मित्रांनो २५ बी.एच.पी. इंजिन लागणार.!!!! 

हे एक आम्हास आव्हानच होते, आता इतक्या शक्तीचे मशिन कुठं मिळणार त्याची किंमत काय असेल ही चर्चा पुण्यात गेल्यावर करू असे ठरवुन आम्ही किल्ला उतरलो. 
दुर्ग आणि त्याचे संवर्सधन याचे शिवधनुष्याचे आव्हान आम्ही स्विकारले आहे मगं हे आव्हान असे किती मोठे असणार. पण हे आव्हान पेलायचे आहे आणि आपल्याला हे काम पुढे नेयचे आहे असे ठरवुन आम्ही आपापल्या घरी गेलो.
संस्थेचे एकहाती सर्व जबाबदारी पार पाडणारे आणि पडेल ते काम हसतमुखाने करणारे श्री. पंडित अतिवाडकर, त्यारात्री कमी झोपले आणि सकाळ झाल्या झाल्या या मशिनची माहिती काढून कोणाकडे मिळू शकेल याची चाचपणी करू लागले. मे महिन्याचा दुसरा आठवडा उजाडला आणि एक प्रकाशबिंदू दिसला. जांभुळवाडी पथावर एक क्लीन ओ. डिझेल नावाची कंपनी आहे ती अशा डिझेल मशिनबद्दल चांगली माहिती देऊ शकेल असे कळाले. लगेचच देशमुख काका आणि पंडित या कंपनीच्या अधिकारी लोकांना भेटायला गेले. 
संस्थेचे काम आणि धडाडी पाहुन कंपनी अधिकारी स्तिमित झाले. त्यांना त्याचे किल्यावरील भ्रमंतीचे दिवस बहुदा आठवले असतील. श्री नातू आणि श्री सप्तर्षी साहेब म्हणाले आम्हाला तुम्ही जरा २ दिवसांनी निवांत भेटयला या! असा निरोप दिला. 
देशमुख काकांना आणि पंडित साहेबांना काही कळेना. बर चालेल म्हणून कंपनीतून बाहेर आले. दिन दिवसानंतर परत त्यांना भेटयला गेले तसे कंपनीच्या साहेबांनी केबिनमध्ये न नेता तडक दोघांना घेऊन वर्कशाॅप घेऊन आले. तेथे एक त्यांच्या कडे असणारे किर्लोस्कर कंपनी २५ बी.एच.पी. शक्तीचे मशिन ठेवलेले होते. त्याच्याकडे नातू साहेबांनी बोट दाखवून म्हणाले. हे इंजिन चालेल का?
आता फक्त आमच्या पायाखालची जमिन सरकायची बाकी होती. हे मशिन त्यांच्या कंपनीमध्ये पडून आहे. आणि या मशिन आता आम्ही वापरतात नाही. तुम्हाला सर्व्हिसिंग करून देतो तुम्ही हे घेऊन जा!!  असे म्हणाल्यावर आम्हाला  आमच्या कानावर विश्वास बसेना. 

"आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे" अशी आमची परिस्थिती झाली. आमचा आनंद गगनात मावेनासा झाला.
या कंपनीचे श्री नातू साहेब म्हणाले अहो आम्ही श्री निनाद बेडेकर सरांबरोबर ट्रेकिंग केलयं. किल्यावर जाऊन तेथे काम करणारी तुमची संस्था एक जगावेगळी गोष्ट करत आहात. आम्हाला तुम्ही करत असलेल्या कामाबद्दल खुप आस्था आहे आणि किल्यांच्या संवर्धनासाठी आम्ही काही मदत करावी म्हणून हे इंजिन तुम्हाला देत आहोत. कृपया याचा स्विकार करावा. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्याच्या संवर्धनासाठी आम्ही जेव्हा पासून सुरवात केली त्यादिवसापासुन कोणते काम पैसा, वस्तू किंवा श्रमदाना अभावी अर्धवट राहिले असे झालेले नाहीं. संस्थेला वस्तुरूपी मिळालेली ही देणगी आजपावतो सर्वात मोठी आहे.

संस्थेतर्फे या कंपनीचे मालक श्री. नातू आणि श्री सप्तर्षी साहेबांचे खुप खुप धन्यवाद. तसेच या कंपनीतील सर्व कर्मचारी यांचे आभार!!!! आम्ही आपले कायम ऋणी राहू आणि हे तांत्रिक अडचणीमुळे थांबलेले काम पुन्हा नव्या ताकदीने पुढे नेऊ हे वचन आम्ही तुम्हाला देतो. 

आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील ।।

खरचं किल्ले होते का?

Courtesy: Pritesh Shinde
नमस्कार मंडळी आज ज्यावेळेस लिहायला बसलो त्यावेळेला मुळात दोन लेख लिहण्य़ासाठी. दोन आठवडे मनात विचार करत होतो आणि दोन्ही विषय खुप महत्वाचे होते पणं कोणत्या लेखापासुन सुरवात करू हे कळत नव्हते. आज संकल्प केला आणि ठरवलं की ज्या चित्राने विचार करायला, अंतर्मुख व्हायला झाले त्याबद्दल आधी लिहावे.
                सदर चित्र हे दुर्गसंवर्धन कार्यात सातत्याने आणि चिकाटीने काम करणारय़ा ’दुर्गवीर’ संस्थेच्या एका स्वयंसेवकाने म्हणजे श्री. प्रितेश शिंदे यांनी काढलेले आहे. हे चित्र येथे देत आहे. याचित्रात शिवकाळ, आजची आणि भविष्यातील काय परिस्थिती असेल असा भाव त्यामध्ये दाखवला आहे. यामध्ये बरयांच लोकांना वाटेल की खरचं असा होता का? खरचं अशी परिस्थिती आहे का? आणि भविष्यात असं होऊ शकते का? तर सगळ्याला उत्तर आहे, “हो”. शिवकाळात दुर्गांची निगा कशी राखत याबद्दल आज्ञापत्रात सगळे व्यवस्थितरित्या मांडलेले आहे. किल्य़ांची निगा याच प्रकारे अगदी १८१८ पर्यंत राखली जात होती. मगं इंग्रजांच्य़ा राजवटीत आणि त्यानंतर स्वातंत्र्योत्तर काळ यामध्ये जी अनास्था दिसते, त्याची साक्ष सध्या असलेली किल्यांच्या दुरावस्थेत दिसुन येते. मगं भविष्याचे काय ? हो जर आत्ताच आपणं लक्ष दिले नाही, शास्त्रिय पद्धतीने त्याचे संवर्धन केले नाहीतर पुढची पिढी नक्कीच म्हणेल की “खरचं किल्ले होते का?”

Rajgad BalleKilla - Kalpanik Chitra

 आज श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे करण्य़ात आलेल्या कामातुन किल्याचे अनेक पैलू प्रकाशात आले आहेत. त्याच धर्तींवर एखादी वास्तू कशी असू शकते यांचे कल्पनाचित्र आमच्या एका कार्यकर्त्यांने रेखाटले आहे. जर असे स्वरुप पहावयाचे असल्यास नक्की या चळवळीमध्ये सामिल व्हा.        आज पर्यंत मी अगदी पोटतिडकीने आवाहन करत आलो आहे. दुर्ग संवर्धन कार्य हे फक्त शासनाचे किंवा उन्हातान्हात राबुन काम करणारय़ा चार टाळक्यांच काय जवाबदारी आहे असे मानणारी मंडळी जास्त दिसतात. बरय़ाचदा अगदी शंभर किंवा त्यापेक्षा जास्त लाईक किंवा चार, दोन मेसेज किंवा थंब्सअप असे चित्र संदेश देऊन आपले कार्य संपले असे मानणारे महाभाग सुद्धा आहेत. अशा व्यक्तींनकडे पाहिले की त्यांची कीव कराविशी वाटते.आज माझे सर्वांना आवाहन आहे की पहिले चित्र नीट पहा. स्वत: विचार करा. सद्य आणि भविष्यातील परिस्थीती बदलायची गरज आहे असे वाटल्यास, ज्याज्या ठिकाणी असे संवर्धनाच्या मोहिमा चालू आहेत त्याठिकाणी श्रमरुपी, आर्थिक किंवा पर्यावरण यांसारख्या कामात सहभागी होऊन आपण ही चळवळ अधिक सक्षम बनवा!!नाहितर आहेच फक्त राजांच्या नावाने घोषणा देणे, उत्सव-दिवस साजरे करणे, आपापले कॅमेरे विविध छायाचित्रांनी भरवणे आणि ब्लॉग लिहुन झोपणे.


आपला, 
योगेश फाटक. 
मो.क्र: +९१-९८२३३००७२४ 
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था, पुणे. 
॥ ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील ॥
www.shivdurg.org

www.facebook.com/shivdurg

Monday, December 29, 2014

रोहिडा महोत्सव


 श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे आठवड्यापुर्वी रोहिडा महोत्सवाचे दि. २७ आणि २८ डिसेंबर २०१४ रोजी आयोजन करण्यात आले होते. किल्ला आणि त्याच्या जवळील पंचक्रोषीतील गावाच्या मदतीने ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्याचा प्रयत्न संस्थेच्यावतीने करण्यात आला.
 











 या महोत्सवच्या उद्घाटनांसाठी प्रमुख उपस्थिती लाभली ती स्थानिक आमदार श्री संग्रामदादा थोपटे. तसेच शासनाच्या वन आणि पुरातत्व विभागातील मान्यवरांची. मुख्य वन संरक्षक श्री जीतसिंग आणि पुरातत्व विभागाचे पुणे जिल्हाचे मुख्य श्री कांबळे साहेब यांची. जेष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे आणि श्री सदाशिवराव शिवदे साहेब यांनी या उपक्रमांचे खुप कौतुक केले. किल्याच्या सानिध्यात असा महोत्सव घडणे तसे पहिल्यांदाच असे त्यांनी नमूद केले.
(स्वागतगीताचे समुह गायन)  
 स्वागत सभारंभाला आपल्या परंपरेला अनुसरून गावातील १० मुलींनी स्वागत गीत बसवलेले होते त्याच्या समूह गायनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.  मान्यवारांची भाषणे झाली आणि नियोजीत कार्यक्रमाला सुरवात झाली. सकाळी कार्यक्रमाच्या आधी वासुदेवाने उपस्थिती लावून या कार्यक्रमाला आशिर्वाद दिले. (वासुदेव)
गावाच्या परंपरेला साजेल अशा ढोल लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये बालगोपालांनी जंगल संवर्धना पासून ते मानवी जीवनाच्या नीतीमूल्यांच्या संदर्भात आवाहन केले. यामध्ये सामील झालेले विद्यार्थ्यांचा उत्साहाचे विशेष कौतुक करावयास पाहिजे. लेझीम सर्व वयोगटातील मुलांचा अंतर्भाव यामध्ये करून घेतला बद्दल सर्व गुरूजानांचे आभार मानले पाहिजेत.
याकार्यक्रमाची सांगता झाल्यावर एक जोरदार हात पडला तो शाहिरांचा त्यांच्या डफावर. शाहिर परंपरेचे अनुरूप गणेशवंदने पासून सुरवात झाली. ही वंदना शाहिरी थाटात एका मुलीने सादर केली. मगं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याचे शौर्यरसात वर्णन प्रत्येक शाहीराने सादर केले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या हौतात्म्याचे वर्णन ऐकताना सर्वांचे डोळे पाणावले. पोवाडा हा असाच आपला इतिहास रचणारे शुरविरांचा शौर्याचा सांगावा शौर्यरसात मांडताना आपसुक आपल्या डोळ्यात अश्रू आणणारा!!! (पोवाडा)

           याकार्यक्रमानंतर सर्वांनी ग्रामस्थांच्या सानिध्यात ग्रामजेवणाचा आस्वाद घेतला. ऐरवी आपण आपले कुटुंबासोबत जेवाणारे यावेळी गावकरी लोकांच्या मांडिला मांडी लावून सहभोजनाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर सगळ्यांना आराम करण्याससाठी काही वेळ राखून ठेवण्यात आली होती. यासाठी सोय मुद्दामच करण्यात आली नव्हती. यामहोत्सवात सामील झालेल्या सर्व व्यक्ती एखादी सावली शोधुन अाराम करत होती. कोणी झाडाच्या सावलीत तर कोणी एखादा आडोसा बघून आराम फर्मावत होते. हा अनुभव महत्वाचा कारण असे आपल्याला शहरात केव्हा अनुभवयाला मिळणार!!

उतरतीचे ऊन लागल्यावर मुख्य कार्यक्रम होता तो आपल्या पारंपारिक खेळांचा. (विट्टी-दांडू) विट्टीदांडूनी सुरवात झाल्यावर आपल्या प्रत्येकातील बालमनाचा ठाव याखेळाने घेतला. सर्वांनी या खेळामध्ये भाग घेतला कोण विट्टि कोलवण्यात बाद होत होते तर लांब कोलवलेली विट्टी बघून रोमहर्षीत होत होतें. एकूणच या खेळाने एक नविन उत्साह सर्वांच्यामध्ये भरला. लगोरीचा खेळाचे प्रात्यक्षिक स्थानिक गावातील मुलींने दाखवले. अगदी सर्वाना लाजवेल अशा चपळाईने त्याखेळत होत्या.
(लगोरी)

(लगोरी)
(सर्पमित्र) या नंतरचा कार्यक्रम होता तो थोडा कुतुहलाचा!! लहान पणापासून आपल्याला या निसर्गातील काही प्राण्याबद्दल भिती आणि कुतुहल असते. त्यामध्ये साप प्रजातीबद्दल सर्वात जास्त असते. म्हणूनच या प्रजातींच्या बद्दल ओळख होण्याच्या दृष्टीने भोर आणि आजुबाजुच्या भागात कामकरणारे सर्पमित्रांनी. अनुभव आणि साप प्रजातींच्या अभ्यासाचे विषश्लेषण त्यांनी गावकरी मंडळी आणि पर्यटकांसमोर माडले. यातून मुख्य हेतू तो साप आणि त्याच्याशी निगडित असलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन.

(पारंपारीक कार्यक्रम)     
      याकार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी खरी मेजवानी दिली ती पारंपारिक गोंधळ, भजन अशा मुलांनी बसवलेल्या कार्यक्रमाची. (लावणी) लावणी नृत्य सादर करणारी ती छोटी मुलगी सगळ्यांची दाद मिळवून गेली. सर्वात जास्त टाळ्या आणि दाद मिळवून गेला तो होता संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा. संत तुकारामाच्या विविध रचनांचे मुलांनी सादरीकरण केले. आणि सर्वात शेवटी गरूडावर आरूढ होऊन वैकुंठी गेले.


(संत तुकारामांचे वैकुंठ गमन)



हेची दान देगा देवा।
तूझा विसर न व्हावा॥
गुण गाईन आवडी,
हेची माझी सर्व गोडी॥
या अंभगांच्या गजरात सर्वांचे डोळे पाणावले आणि तुकारामाच्या भुमिकेतली ती मुलगी गरुडावर बसून हवेतून पुढे गेली. याने सर्व उपस्थितांची मने जिंकली.
वेळ कमी पडल्याने शेज आरती आणि न्यानज्योतचा कार्यक्रम आम्हाला घेता आला नाही याची रूखरूख मनात राहून आम्ही जेवायला बसलो. एव्हाना थंडी वाढली होती आणि त्याजोडिला वारा सुद्धा वाहत होता. जेवणानंतरचा कार्यक्रम होता तो आकाशदर्शनाचा. यातुन पर्यटक आणि गावकरी यांना दुर्बिणीतून गुरु, चंद्र आणि नक्शत्रे दाखवण्यात आली. चंद्र आणि सप्तर्षी ध्रुव तारा यांच्या मदतीने दिशा कशा ओळखव्यात याचे मार्ग दर्शन करण्यात आले. थंडीचा जोर जसा वाढत होता तसे एक एक जण आपल्या नियोजित तंबूमध्ये जात होता. कारण ती वेळ होती निद्रा देवीच्या उपासनेची. :-)
  (रोहिडा भ्रमंती.) दुसरा दिवस होता तो रोहिडा किल्याच्यावर भ्रमंतीचा. आमच्या संस्थाने आजवर केलेल्या संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती आणि स्थल दर्शन हे श्री दर्शन वाघ घडवून आणणार होतें. किल्यावर पोहचल्यावर उपस्थितांना नाष्टा देण्यात आला आणि त्याचबरोबर किल्यावर ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व सांगण्यात आले. हे सर्व झाल्यानंतर किल्ला फिरून दाखवण्यात आला. सदर, मंदिर, बुरूज, दरवाजे व त्यावरील शीलालेख आणि शिल्प दाखवण्यात आली.



 किल्यावर प्रत्येक वास्तू पर्यंत पोहचण्यासाठी कच्चे रस्ते आखण्यात आले त्यावरून मार्गक्रमण करत सर्व वास्तू दाखवण्यात आल्या.  नंतर गड उतरून ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेतल्या नंतर कार्यक्रमाची औपचारिक सांगता झाली आणि सर्वजण परतू लागले.
                               एकूणच हा महोत्सव सर्वांसाठी एक वेगळा अनुभूती देणारा होता. किल्याच्या सानिध्यात ग्रामीण जीवनाचा अनुभव हा सर्वांना काहीतरी देऊन गेलाच असेल यात शंका नाही.दुर्गांवरिल पर्यटन या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम व त्याचा अहवाल शासन दरबारी सादर करण्याचा मानस आहे ज्यातुन अशा उपक्रमांमुळे एक पर्यटनासाठी नवे दालन उघडले जाईल.
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या या उपक्रमाला आपण दिलेला प्रतिसादाबद्दल संस्था आपली ऋणी आहे.

आपला,
योगेश फाटक.
मो. +९२-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/

Sunday, February 19, 2012

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेची सर्वात मोठी नागरी मोहिम:

नमस्कार,


श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेची सर्वात मोठी नागरी मोहिम:



२०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्र, शिवजयंती तसेच जोडून आलेल्या शनिवार आणि राविवार याचे औचित्य साधून संस्थेने मोठी नागरी मोहिम आखली होती. यामध्ये आधीपासुन वृत्तपत्रातुन तसेच नविन संभाषणाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात आले. मोहिमेच्या सुरवातीला १५०+ लोकांनी नोंदणी केली. ज्या दिवशी मोहिम सुरु झाली तो वार होता शुक्रवार, मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये संस्थेने कामास सुरवात केली. शनिवार रविवार या मुख्य दोन दिवसात श्रमदानासाठी आलेल्या लोकांची संख्या होती तब्बल २६०. या मोहिमेत संस्थेने पद्मावती माची, संजीवनी माची बालेकिल्ला यावर संवर्धन मोहिमा राबवल्या.



१) पद्मावती माची: किल्यावरील दृश्य आणि गाठलेल्या अवस्थेमधला कचरा गोळा करण्यात आला. प्लास्टिक कचरा ते अगदी दारूच्या बाटल्या सर्व स्वच्छ करण्यात आला. अगदी कानाकोपऱ्यात जाऊन सहभागी व्यक्तींनी कचरा गोळा केला, हा कचरा तब्बल ८ पोती होता. दुखःची गोष्ट की यात दोन पोती नुसत्या दारूच्या बाटल्या आणि तोडलेल्या काचेच्या बाटल्या होत्या. मनुष्यनिर्मित कचरा स्वच्छ झाल्यानंतर पद्मावती माची वरील अंबारखाना, उभ्या असलेल्या वास्तू, सदर मोठ्या वाड्याची स्वच्छता करण्यात आली. यावर वाढलेले गवत आणि झाडी झुडपे काढून जोते आणि वास्तू पुर्नउजेडात आणण्यात आल्या. पद्मावती तलावाच्या जवळील वाड्यांची जोती पूर्ण स्वच्छ करण्यात आली. याच माचीवर पूर्वीच्या काळात जास्त वास्तव्य असावे याचे प्रचिती एक एक वास्तू स्वच्छ करताना येत होती. किल्याच्या पूर्वेच्या तटात साखळीने शौचकुप आढळली, त्यांची सुद्धा स्वच्छता करण्यात आली. या माचीवर असणारे दोन पाण्याचे स्त्रोत असलेले टाकी आहेत. त्यामध्ये वाहून आलेल्या मातीचा गाळ आणि मागच्या भिंतीचे पडलेले घडिव दगड होते. या दोन्ही टाक्या स्वच्छ करुन पडलेल्या दगडांची ताल बाधुन घेण्यात आली. पद्मावती देवीचे देऊळ व त्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.




२) संजीवनी माची: एकुण या किल्याला ३ माची आहेत. सुवेळा, पद्मावती आणि संजीवनी माची. या तिन्ही माचीची बांधणी म्हणजे दुर्ग स्थापत्यशास्त्राताचा एक उत्तम नमुना, चिलखती बुरूज, चोर दरवाजा, बेलाग बुरूज. व त्या माचीच्या संरक्षणाकरता असलेल्या चौक्या. सर्वप्रथम यामाचीला मार्गात असलेली चौकी स्वच्छ करण्यात आली. वाढलेली गवतझुडपे काढून मोकळी करण्यात आली. पडलेल्या दगडांची ताल त्याच जागी ताल बांधून घेण्यात आली. चिलखती तटबंदी मधील वाढलेले आणि वास्तूला धोकादायक असलेली झाडी स्वच्छ करण्यात आली. याच तटबंदी मध्ये असणारे चोर दरवाजे स्वच्छ करण्यात आले. जागोजागी पडलेल्या घडिव दगड त्याच जागी रचून ठेवण्यात आले. ज्यावेळेला याची स्वच्छता झाली त्यावेळी यामाचीचे रुप खूप देखणे होतें.


३) बालेकिल्ला: बालेकिल्याच्यावरील वास्तू, पाण्याचे स्त्रोत यांची अवलोकन करून स्वच्छतेला सुरवात करण्यात आली. या ठिकाणी भरपुर वाडे, अंबारखाने आहेत. त्याची प्रशस्तता पहाता हे नक्कीच जाणवते की येथे महाराजांच्या रहाण्यासाठी निर्मिती झाली आहे. किल्यावरील काम आणि वेळ कमी पडल्याने यांची स्वच्छता त्या मोहिमेच्या दिवसात पुर्णत्वास न्हेता असली नाही पण पुढील काळात हे काम पूर्ण करण्यात आले.


यामोहिमेमध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग आणि उत्साह वाखण्याजोगा आहे. यामोहिमेमुळे जोडले गेलेले लोक आजतागायत संस्थेच्या विविध मोहिमांमध्ये मावळ्याच्या शक्तीने आणि भक्तीने सामील होत आहेत. यामोहिमेमध्ये पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार यांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक पाईक म्हणून गडावर ३ दिवस आमच्या समवेत होते. त्यांच्या मार्ग दर्शनाखाली सर्व कामे चालू होती.

याकरता आम्ही शासनाचे ऋणी आहोत.


यामोहिमेची माहिती पुन्हा प्रसारित करण्याचे कारण म्हणजे यातुन संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या मोहिमांची माहिती व्हावी आणि दुर्ग संवर्धनासाठी आपल्यातील व्यक्ती जोडल्या जाव्यात हा हेतू आहे. टीव्हीवर, संमेलनात किंवा कधी किल्यावर जाऊन त्याच्या दुरावस्थेबद्दल चर्चा करणारे व्यक्ती आहेत. पणं ज्याचे संवर्धन करावयाचे आहे त्याची तांत्रिक अडचणी, आव्हाने काय आहेत हे जाणून घेयचे असेल तर अशा कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा जेणेकरून तुमच्या चर्चेला कार्याच्या अनुभवाची जोड लाभेल.



सोबत जोडलेली काही प्रकाशचित्रे आपल्याला अधिक माहिती देतील.




आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/