Sunday, February 19, 2012

श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेची सर्वात मोठी नागरी मोहिम:

नमस्कार,


श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेची सर्वात मोठी नागरी मोहिम:



२०१२ च्या फेब्रुवारी महिन्यात महाशिवरात्र, शिवजयंती तसेच जोडून आलेल्या शनिवार आणि राविवार याचे औचित्य साधून संस्थेने मोठी नागरी मोहिम आखली होती. यामध्ये आधीपासुन वृत्तपत्रातुन तसेच नविन संभाषणाच्या माध्यमातून लोकांना आवाहन करण्यात आले. मोहिमेच्या सुरवातीला १५०+ लोकांनी नोंदणी केली. ज्या दिवशी मोहिम सुरु झाली तो वार होता शुक्रवार, मोजक्या लोकांच्या उपस्थितीमध्ये संस्थेने कामास सुरवात केली. शनिवार रविवार या मुख्य दोन दिवसात श्रमदानासाठी आलेल्या लोकांची संख्या होती तब्बल २६०. या मोहिमेत संस्थेने पद्मावती माची, संजीवनी माची बालेकिल्ला यावर संवर्धन मोहिमा राबवल्या.



१) पद्मावती माची: किल्यावरील दृश्य आणि गाठलेल्या अवस्थेमधला कचरा गोळा करण्यात आला. प्लास्टिक कचरा ते अगदी दारूच्या बाटल्या सर्व स्वच्छ करण्यात आला. अगदी कानाकोपऱ्यात जाऊन सहभागी व्यक्तींनी कचरा गोळा केला, हा कचरा तब्बल ८ पोती होता. दुखःची गोष्ट की यात दोन पोती नुसत्या दारूच्या बाटल्या आणि तोडलेल्या काचेच्या बाटल्या होत्या. मनुष्यनिर्मित कचरा स्वच्छ झाल्यानंतर पद्मावती माची वरील अंबारखाना, उभ्या असलेल्या वास्तू, सदर मोठ्या वाड्याची स्वच्छता करण्यात आली. यावर वाढलेले गवत आणि झाडी झुडपे काढून जोते आणि वास्तू पुर्नउजेडात आणण्यात आल्या. पद्मावती तलावाच्या जवळील वाड्यांची जोती पूर्ण स्वच्छ करण्यात आली. याच माचीवर पूर्वीच्या काळात जास्त वास्तव्य असावे याचे प्रचिती एक एक वास्तू स्वच्छ करताना येत होती. किल्याच्या पूर्वेच्या तटात साखळीने शौचकुप आढळली, त्यांची सुद्धा स्वच्छता करण्यात आली. या माचीवर असणारे दोन पाण्याचे स्त्रोत असलेले टाकी आहेत. त्यामध्ये वाहून आलेल्या मातीचा गाळ आणि मागच्या भिंतीचे पडलेले घडिव दगड होते. या दोन्ही टाक्या स्वच्छ करुन पडलेल्या दगडांची ताल बाधुन घेण्यात आली. पद्मावती देवीचे देऊळ व त्याच्या परिसराची स्वच्छता करण्यात आली.




२) संजीवनी माची: एकुण या किल्याला ३ माची आहेत. सुवेळा, पद्मावती आणि संजीवनी माची. या तिन्ही माचीची बांधणी म्हणजे दुर्ग स्थापत्यशास्त्राताचा एक उत्तम नमुना, चिलखती बुरूज, चोर दरवाजा, बेलाग बुरूज. व त्या माचीच्या संरक्षणाकरता असलेल्या चौक्या. सर्वप्रथम यामाचीला मार्गात असलेली चौकी स्वच्छ करण्यात आली. वाढलेली गवतझुडपे काढून मोकळी करण्यात आली. पडलेल्या दगडांची ताल त्याच जागी ताल बांधून घेण्यात आली. चिलखती तटबंदी मधील वाढलेले आणि वास्तूला धोकादायक असलेली झाडी स्वच्छ करण्यात आली. याच तटबंदी मध्ये असणारे चोर दरवाजे स्वच्छ करण्यात आले. जागोजागी पडलेल्या घडिव दगड त्याच जागी रचून ठेवण्यात आले. ज्यावेळेला याची स्वच्छता झाली त्यावेळी यामाचीचे रुप खूप देखणे होतें.


३) बालेकिल्ला: बालेकिल्याच्यावरील वास्तू, पाण्याचे स्त्रोत यांची अवलोकन करून स्वच्छतेला सुरवात करण्यात आली. या ठिकाणी भरपुर वाडे, अंबारखाने आहेत. त्याची प्रशस्तता पहाता हे नक्कीच जाणवते की येथे महाराजांच्या रहाण्यासाठी निर्मिती झाली आहे. किल्यावरील काम आणि वेळ कमी पडल्याने यांची स्वच्छता त्या मोहिमेच्या दिवसात पुर्णत्वास न्हेता असली नाही पण पुढील काळात हे काम पूर्ण करण्यात आले.


यामोहिमेमध्ये अनेक व्यक्तींचा सहभाग आणि उत्साह वाखण्याजोगा आहे. यामोहिमेमुळे जोडले गेलेले लोक आजतागायत संस्थेच्या विविध मोहिमांमध्ये मावळ्याच्या शक्तीने आणि भक्तीने सामील होत आहेत. यामोहिमेमध्ये पुरातत्व विभाग महाराष्ट्र सरकार यांचे प्रतिनिधी म्हणून आणि एक पाईक म्हणून गडावर ३ दिवस आमच्या समवेत होते. त्यांच्या मार्ग दर्शनाखाली सर्व कामे चालू होती.

याकरता आम्ही शासनाचे ऋणी आहोत.


यामोहिमेची माहिती पुन्हा प्रसारित करण्याचे कारण म्हणजे यातुन संस्थेच्यावतीने करण्यात आलेल्या मोहिमांची माहिती व्हावी आणि दुर्ग संवर्धनासाठी आपल्यातील व्यक्ती जोडल्या जाव्यात हा हेतू आहे. टीव्हीवर, संमेलनात किंवा कधी किल्यावर जाऊन त्याच्या दुरावस्थेबद्दल चर्चा करणारे व्यक्ती आहेत. पणं ज्याचे संवर्धन करावयाचे आहे त्याची तांत्रिक अडचणी, आव्हाने काय आहेत हे जाणून घेयचे असेल तर अशा कार्यात सक्रिय सहभाग घ्यावा जेणेकरून तुमच्या चर्चेला कार्याच्या अनुभवाची जोड लाभेल.



सोबत जोडलेली काही प्रकाशचित्रे आपल्याला अधिक माहिती देतील.




आपला,
योगेश फाटक.
मो. +९१-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/