Monday, December 29, 2014

रोहिडा महोत्सव


 श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेतर्फे आठवड्यापुर्वी रोहिडा महोत्सवाचे दि. २७ आणि २८ डिसेंबर २०१४ रोजी आयोजन करण्यात आले होते. किल्ला आणि त्याच्या जवळील पंचक्रोषीतील गावाच्या मदतीने ग्रामीण जीवनाचा अनुभव देण्याचा प्रयत्न संस्थेच्यावतीने करण्यात आला.
 











 या महोत्सवच्या उद्घाटनांसाठी प्रमुख उपस्थिती लाभली ती स्थानिक आमदार श्री संग्रामदादा थोपटे. तसेच शासनाच्या वन आणि पुरातत्व विभागातील मान्यवरांची. मुख्य वन संरक्षक श्री जीतसिंग आणि पुरातत्व विभागाचे पुणे जिल्हाचे मुख्य श्री कांबळे साहेब यांची. जेष्ठ इतिहास संशोधक श्री पांडुरंग बलकवडे आणि श्री सदाशिवराव शिवदे साहेब यांनी या उपक्रमांचे खुप कौतुक केले. किल्याच्या सानिध्यात असा महोत्सव घडणे तसे पहिल्यांदाच असे त्यांनी नमूद केले.
(स्वागतगीताचे समुह गायन)  
 स्वागत सभारंभाला आपल्या परंपरेला अनुसरून गावातील १० मुलींनी स्वागत गीत बसवलेले होते त्याच्या समूह गायनाने कार्यक्रमाची सुरवात झाली.  मान्यवारांची भाषणे झाली आणि नियोजीत कार्यक्रमाला सुरवात झाली. सकाळी कार्यक्रमाच्या आधी वासुदेवाने उपस्थिती लावून या कार्यक्रमाला आशिर्वाद दिले. (वासुदेव)
गावाच्या परंपरेला साजेल अशा ढोल लेझीम खेळाचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले. या प्रात्यक्षिकामध्ये बालगोपालांनी जंगल संवर्धना पासून ते मानवी जीवनाच्या नीतीमूल्यांच्या संदर्भात आवाहन केले. यामध्ये सामील झालेले विद्यार्थ्यांचा उत्साहाचे विशेष कौतुक करावयास पाहिजे. लेझीम सर्व वयोगटातील मुलांचा अंतर्भाव यामध्ये करून घेतला बद्दल सर्व गुरूजानांचे आभार मानले पाहिजेत.
याकार्यक्रमाची सांगता झाल्यावर एक जोरदार हात पडला तो शाहिरांचा त्यांच्या डफावर. शाहिर परंपरेचे अनुरूप गणेशवंदने पासून सुरवात झाली. ही वंदना शाहिरी थाटात एका मुलीने सादर केली. मगं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्य स्थापनेच्या कार्याचे शौर्यरसात वर्णन प्रत्येक शाहीराने सादर केले. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या हौतात्म्याचे वर्णन ऐकताना सर्वांचे डोळे पाणावले. पोवाडा हा असाच आपला इतिहास रचणारे शुरविरांचा शौर्याचा सांगावा शौर्यरसात मांडताना आपसुक आपल्या डोळ्यात अश्रू आणणारा!!! (पोवाडा)

           याकार्यक्रमानंतर सर्वांनी ग्रामस्थांच्या सानिध्यात ग्रामजेवणाचा आस्वाद घेतला. ऐरवी आपण आपले कुटुंबासोबत जेवाणारे यावेळी गावकरी लोकांच्या मांडिला मांडी लावून सहभोजनाचा आस्वाद घेतला. जेवणानंतर सगळ्यांना आराम करण्याससाठी काही वेळ राखून ठेवण्यात आली होती. यासाठी सोय मुद्दामच करण्यात आली नव्हती. यामहोत्सवात सामील झालेल्या सर्व व्यक्ती एखादी सावली शोधुन अाराम करत होती. कोणी झाडाच्या सावलीत तर कोणी एखादा आडोसा बघून आराम फर्मावत होते. हा अनुभव महत्वाचा कारण असे आपल्याला शहरात केव्हा अनुभवयाला मिळणार!!

उतरतीचे ऊन लागल्यावर मुख्य कार्यक्रम होता तो आपल्या पारंपारिक खेळांचा. (विट्टी-दांडू) विट्टीदांडूनी सुरवात झाल्यावर आपल्या प्रत्येकातील बालमनाचा ठाव याखेळाने घेतला. सर्वांनी या खेळामध्ये भाग घेतला कोण विट्टि कोलवण्यात बाद होत होते तर लांब कोलवलेली विट्टी बघून रोमहर्षीत होत होतें. एकूणच या खेळाने एक नविन उत्साह सर्वांच्यामध्ये भरला. लगोरीचा खेळाचे प्रात्यक्षिक स्थानिक गावातील मुलींने दाखवले. अगदी सर्वाना लाजवेल अशा चपळाईने त्याखेळत होत्या.
(लगोरी)

(लगोरी)
(सर्पमित्र) या नंतरचा कार्यक्रम होता तो थोडा कुतुहलाचा!! लहान पणापासून आपल्याला या निसर्गातील काही प्राण्याबद्दल भिती आणि कुतुहल असते. त्यामध्ये साप प्रजातीबद्दल सर्वात जास्त असते. म्हणूनच या प्रजातींच्या बद्दल ओळख होण्याच्या दृष्टीने भोर आणि आजुबाजुच्या भागात कामकरणारे सर्पमित्रांनी. अनुभव आणि साप प्रजातींच्या अभ्यासाचे विषश्लेषण त्यांनी गावकरी मंडळी आणि पर्यटकांसमोर माडले. यातून मुख्य हेतू तो साप आणि त्याच्याशी निगडित असलेल्या अंधश्रद्धांचे निर्मूलन.

(पारंपारीक कार्यक्रम)     
      याकार्यक्रमानंतर ग्रामस्थांनी खरी मेजवानी दिली ती पारंपारिक गोंधळ, भजन अशा मुलांनी बसवलेल्या कार्यक्रमाची. (लावणी) लावणी नृत्य सादर करणारी ती छोटी मुलगी सगळ्यांची दाद मिळवून गेली. सर्वात जास्त टाळ्या आणि दाद मिळवून गेला तो होता संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठ गमनाचा. संत तुकारामाच्या विविध रचनांचे मुलांनी सादरीकरण केले. आणि सर्वात शेवटी गरूडावर आरूढ होऊन वैकुंठी गेले.


(संत तुकारामांचे वैकुंठ गमन)



हेची दान देगा देवा।
तूझा विसर न व्हावा॥
गुण गाईन आवडी,
हेची माझी सर्व गोडी॥
या अंभगांच्या गजरात सर्वांचे डोळे पाणावले आणि तुकारामाच्या भुमिकेतली ती मुलगी गरुडावर बसून हवेतून पुढे गेली. याने सर्व उपस्थितांची मने जिंकली.
वेळ कमी पडल्याने शेज आरती आणि न्यानज्योतचा कार्यक्रम आम्हाला घेता आला नाही याची रूखरूख मनात राहून आम्ही जेवायला बसलो. एव्हाना थंडी वाढली होती आणि त्याजोडिला वारा सुद्धा वाहत होता. जेवणानंतरचा कार्यक्रम होता तो आकाशदर्शनाचा. यातुन पर्यटक आणि गावकरी यांना दुर्बिणीतून गुरु, चंद्र आणि नक्शत्रे दाखवण्यात आली. चंद्र आणि सप्तर्षी ध्रुव तारा यांच्या मदतीने दिशा कशा ओळखव्यात याचे मार्ग दर्शन करण्यात आले. थंडीचा जोर जसा वाढत होता तसे एक एक जण आपल्या नियोजित तंबूमध्ये जात होता. कारण ती वेळ होती निद्रा देवीच्या उपासनेची. :-)
  (रोहिडा भ्रमंती.) दुसरा दिवस होता तो रोहिडा किल्याच्यावर भ्रमंतीचा. आमच्या संस्थाने आजवर केलेल्या संवर्धनाच्या उपक्रमांची माहिती आणि स्थल दर्शन हे श्री दर्शन वाघ घडवून आणणार होतें. किल्यावर पोहचल्यावर उपस्थितांना नाष्टा देण्यात आला आणि त्याचबरोबर किल्यावर ऐतिहासिक आणि भौगोलिक महत्व सांगण्यात आले. हे सर्व झाल्यानंतर किल्ला फिरून दाखवण्यात आला. सदर, मंदिर, बुरूज, दरवाजे व त्यावरील शीलालेख आणि शिल्प दाखवण्यात आली.



 किल्यावर प्रत्येक वास्तू पर्यंत पोहचण्यासाठी कच्चे रस्ते आखण्यात आले त्यावरून मार्गक्रमण करत सर्व वास्तू दाखवण्यात आल्या.  नंतर गड उतरून ग्रामीण जेवणाचा आस्वाद घेतल्या नंतर कार्यक्रमाची औपचारिक सांगता झाली आणि सर्वजण परतू लागले.
                               एकूणच हा महोत्सव सर्वांसाठी एक वेगळा अनुभूती देणारा होता. किल्याच्या सानिध्यात ग्रामीण जीवनाचा अनुभव हा सर्वांना काहीतरी देऊन गेलाच असेल यात शंका नाही.दुर्गांवरिल पर्यटन या संकल्पनेवर आधारीत कार्यक्रम व त्याचा अहवाल शासन दरबारी सादर करण्याचा मानस आहे ज्यातुन अशा उपक्रमांमुळे एक पर्यटनासाठी नवे दालन उघडले जाईल.
श्री शिवदुर्ग संवर्धन संस्थेच्या या उपक्रमाला आपण दिलेला प्रतिसादाबद्दल संस्था आपली ऋणी आहे.

आपला,
योगेश फाटक.
मो. +९२-९८२३३००७२४.
श्री शिवदुर्ग संवर्धन, पुणे.
।। ऐतिहासिक वास्तूंच्या संवर्धनासाठी प्रयत्नशील।।
http://www.shivdurg.org/
https://www.facebook.com/shivdurg/